← Back to News

सोशल मीडियाच्या युगातील विवेकानंद

महाराष्ट्र जनशक्ती
विशेष लेख

लेखक: डॉ. नामदेव (देवा) वैजनाथ कचरे

भूगोलशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर

Published in Aurangabad Editionसौजन्य: Maharashtra Janshakti

आजचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. स्मार्टफोनच्या पडद्यावर जग सामावले आहे. संवाद सुलभ झाला आहे, अभिव्यक्तीला नवे व्यासपीठ मिळाले आहे आणि माहिती क्षणात उपलब्ध होते. तरीही या 'जोडलेल्या' जगात माणूस अधिकच एकाकी, अस्वस्थ आणि तणावग्रस्त होत चालला आहे, सतत ऑनलाइन असूनही मन मात्र अंतर्मुख होण्यास वेळ शोधत आहे. 'लाईक्स', 'फॉलोअर्स' आणि 'व्ह्यूज' यांच्या आकडेवारीमध्ये आत्ममूल्य शोधण्याची धडपड पाहताना दिसते. अशा वेळी स्वामी विवेकानंद यांची जयंती आपल्याला आत्मपरीक्षणाची संधी देते. विवेकानंद म्हणजे केवळ संन्यासी किंवा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नव्हे, तर आत्मविश्वास, विवेक आणि निर्भयतेचा जिवंत विचार आहेत. त्यांनी त्या युगातील 'उठा, जागे व्हा' असा संदेश दिला, तो युवक आजही अस्तित्वात आहे. फरक एवढाच की हातात मशाल ऐवजी मोबाईल आहे. बाह्य साधनांनी सक्षम झालेला, पण अंतर्मन थोडे शोषणांना हा आजचा युवक विवेकानंदांच्या विचारांकडे नव्याने पाहण्याची गरज आहे.

विवेकानंदांच्या मते 'आत्मविश्वास'

स्वामी विवेकानंद यांचा जीवनप्रवास आत्मविश्वासाचा उत्तम उदाहरण आहे. त्यांचे विचार हे केवळ धार्मिक किंवा तात्त्विक नव्हते; ते व्यावहारिक, जीवनाला दिशा देणारे आणि प्रत्येक युवकासाठी मार्गदर्शक ठरणारे होते. त्यांच्या मते 'स्वत:वर विश्वास ठेवा.' ते म्हणायचे, "ज्याला स्वतःवर विश्वास ठेवता येत नाही, तर जगावर ठेवण्याचा अधिकार नाही." हा संदेश आजच्या डिजिटल युगातील युवकांसाठी अधिकच प्रासंगिक आहे. आजचा युवक सोशल मीडियाच्या काल्पनिक जगात गुरफटलेला आहे. परंतु त्याच्या आत्मविश्वासाचा आकडा 'लाईक्स', 'फॉलोअर्स' किंवा इतरांच्या यशाची तुलना यावर अवलंबून असतो. जेव्हा मनावर नियंत्रण नसते, तेव्हा बाह्य मान्यतेवर आधारित आत्ममूल्य फक्त तात्पुरते समाधान देऊ शकते.

विवेकानंदांचा आत्मविश्वास अंतःकरणातून जन्माला येणारा असतो; तो कोणत्याही परिस्थितीत टिकतो, कोणत्याही दबावाखाली हलत नाही. उदाहरणार्थ, शिकागो धर्मपरिषदेत त्यांनी आपला विचार मांडला, एका अनोळखी देशात, अनोळखी लोकांच्या समोर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी एक क्षणही संकोचले नाहीत. आत्मविश्वासामुळेच त्यांनी संपूर्ण विश्वाला भारतीय संस्कृती आणि युवा शक्तीचे महत्त्व सांगू शकले. आजच्या युवकाची ही आत्मविश्वासाची शिकवण आत्मसात केली पाहिजे. सोशल मीडियावर दिसणारी चमक किंवा लोकप्रियता ही असली ताकद नव्हे; खरी शक्ती ही अंतर्मनाच्या स्पष्टता आणि स्वत:वर दृढ विश्वास ठेवण्यात आहे. विवेकानंदांच्या मुलामंत्राप्रमाणे - 'स्वत:वर विश्वास ठेवा' आणि आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरणे आजच्या डिजिटल युगातील युवकांच्या जीवनात क्रांती घडवून आणू शकते.

सोशल मीडिया आणि तुलनात्मक वृत्ती

फेसबुक, इंस्टाग्राम, X (पूर्वी ट्विटर), टिक टॉक यांसारख्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येकजण स्वतःची चकाकणारी, यश आणि अनुभव 'परफेक्ट' स्वरूपात सादर करतो. या डिजिटल जगात युवकांना सतत तुलना करण्याची संधी मिळते. त्यांमुळे आत्मविश्वास कमी होणे किंवा नैराश्य येण्याची शक्यता असते. 'माझे फोटो कोणी किती लाईक करतात?' या तुलनेत स्वतःला कमी लेखण्याची वृत्ती वाढते. यामुळे व्यक्तिमत्त्वावर गंभीर परिणाम होतो. स्वामी विवेकानंदांचा दृष्टिकोन या संदर्भात अगदी स्पष्ट आहे. ते म्हणायचे, "तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तर जग कधीच ठेवणार नाही." आत्मविश्वास हा अंतर्मनातून जन्माला येतो, बाह्य मान्यतेवर अवलंबून नसतो.

सोशल मीडियावर असलेली आभासी चमक अनेकदा तात्पुरती समाधान देऊ शकते, पण अंतर्मनाची खरी शक्ती वाढवत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या युवक दररोज अनेक फोटो पोस्ट करतो, परंतु तो स्वत:च्या क्षमतेवर आत्मविश्वास गमावतो. विवेकानंदांच्या शिकवणुकीनुसार, आत्मप्रतीमा ही इतरांच्या तुलनेवर नव्हे, तर स्वतःच्या प्रगतीवर आधारित असावी. युवकांनी सोशल मीडिया वापरून प्रेरणा घेता येते, ज्ञान मिळवता येते, पण स्वतःच्या मूल्यांवर आणि चारित्र्यावर विश्वास टिकवणे हे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे. शेवटी, सोशल मीडियाचे साधन म्हणून लाभ घ्या, पण आत्मप्रतीमा टिकवण्यासाठी अंतर्मुख अभ्यास, ध्यान आणि स्वत:चा आत्मविश्वास असणे गरजेचे आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विवेक

सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक व्यक्तीला आपले विचार व्यक्त करण्याचे अगदी सोपे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ट्विटर, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सॲपवर तरुण क्षणात आपली मते, प्रतिक्रिया किंवा भावना शेअर करतात. हे स्वातंत्र्य खूपच मोलाचे आहे; परंतु त्यासोबत जबाबदारी आणि विवेक असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा अनियंत्रित पोस्ट, चुकीची माहिती किंवा द्वेषपूर्ण कमेंट्स युवकांच्या मानसिक आरोग्यावर आणि समाजावर गंभीर परिणाम करतात. स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणुकीनुसार 'निर्भय व्हा, पण विवेकी राहा'. अभिव्यक्ती फक्त व्यक्त करण्यासाठी नाही, ती समाज, संस्कार आणि सत्य यांची सुसंगत असावी. उदाहरणार्थ, एखादा युवक एखाद्या विषयावर पोस्ट करून सामाजिक गोंधळ निर्माण करतो, तर तात्पुरते स्वत:ला लोकप्रिय वाटेल, पण त्या वर्तनामुळे इतरांवर होणारा परिणाम आणि आपली मानसिक शांती दोन्ही धोक्यात येतात. विवेकानंदांच्या दृष्टिकोनातून, शब्द हे शक्तिशाली आहेत; त्यांचा वापर समाज बांधण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी करावा. आजच्या युवकांसाठी मार्गदर्शन असावे असे म्हणायचे झाल्यास, सोशल मीडियावर व्यक्त होण्यापूर्वी विचार करणे, सत्य तपासणे आणि सकारात्मक संदेश पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे.

धार्मिक सहिष्णुता आणि मानवतावाद

विवेकानंदांचा संदेश स्पष्ट आहे: स्वार्थाच्या पलीकडे जाऊन बोला. आजच्या डिजिटल युगात धर्म आणि श्रद्धांचा प्रसार अतिशय सोप्या झाला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपवरून दररोज धार्मिक पोस्ट्स, प्रवचने किंवा धार्मिक विधींचे व्हिडिओ प्रसारित होतात. या माध्यमांमुळे आपण आपल्या संस्कृतीचा आणि धर्माचा प्रसार करतो, यात शंका नाही. परंतु, या डिजिटल युगात धर्माचे शुद्ध स्वरूप टिकवून ठेवणे हे आव्हान आहे. स्वामी विवेकानंद यांचा धार्मिक दृष्टिकोन हा संकुचित नव्हता, तो उदार आणि मानवतावादी होता. त्यांच्या मते, "सर्व धर्माचे अंतिम ध्येय मानवाचा विकास आणि ईश्वराची जाणीव होणे हेच आहे." आजच्या डिजिटल युगात धर्माचा चुकीचा वापर होऊ नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. अनेकदा इंटरनेटवर धार्मिक विद्वेष पसरवला जातो, ज्यामुळे तरुणांमध्ये कलह निर्माण होऊ शकतो. स्वामीजींच्या मते, धर्माचा खरा अर्थ सेवा आणि त्याग आहे. सोशल मीडियावर धर्माचा प्रचार करताना तो सकारात्मक आणि सर्वसमावेशक असावा. कोणत्याही धर्माचा उपहास करणे किंवा चुकीची माहिती पसरवणे हे धर्माच्या कल्पनेच्या विरुद्ध आहे. युवकांनी धार्मिक पोस्ट्स वाचताना किंवा शेअर करताना विवेकाचा वापर केला पाहिजे. विवेकानंदांनी सांगितलेला 'सर्वधर्मसमभाव' हा मंत्र सोशल मीडियाच्या युगात अधिक महत्त्वाचा ठरतो.

वेळेचे व्यवस्थापन आणि एकाग्रता

सोशल मीडियामुळे वेळेचे व्यवस्थापन कोलमडले आहे. तासनतास रील्स पाहणे, पोस्टवर कमेंट्स पाहणे यामुळे प्रत्यक्ष आयुष्यातील अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. स्वामी विवेकानंद एकाग्रतेवर भर देत असत. एकाग्रता हेच सर्व यशाचे गमक आहे, असे त्यांचे म्हणणे होते. आजच्या युवकांमध्ये एकाग्रतेचा अभाव दिसून येतो. सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे मन चंचल होते. यामुळे मानसिक आरोग्य बिघडते, नैराश्य येते. विवेकानंदांच्या मते, ध्यान आणि योगामुळे मन स्थिर करता येते. डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) ही काळाची गरज आहे.